PANCHAM...



तो काहीही वाजवू शकायचा... तबला, हार्मोनियम, सतार... गिटार... मादल, माउथ ऑर्गन, शिटी, किणकिणते ग्लासेस, डबे, कंगवे, केरसुणी सुद्धा... त्याच्या चाली एकाच वेळी कमालीच्या नव्या ताज्या टवटवीत असायच्या आणि दुसरी कडे भारतीय संगीताच्या जुन्या सशक्त परंपरेशी जोडलेल्याही... एखाद्या तरुण, वेस्टर्न आउटफिट मधल्या मुलीने वडिलधा-यांना चटकन वाकून नमस्कार करावा, तसं वाटायचं त्याची गाणी ऐकताना..त्याच्या संगीताची जादुगिरी आजही तितकीच सतेज आहे. आणि तशीच राहील... शेवटी, त्याच्या नावातच पंचम आहे...
२७ जून च्या धुवाधार पावसाळी संध्याकाळी सचिन देव बर्मन आणि त्यांची गीतकार पत्नी मीरा देव बर्मन यांना हे पंचम नावाचं सुरेल स्वप्न पडलं- मीरा देवींच्या आईने दिलेलं डाकनाम तर टूबलु होतं, पण असं म्हणतात की हे बाळ रडायचं तेव्हा थेट पंचम लागायचा- म्हणून सचिन देव बर्मननी आपल्या ह्या मुलाचं डाकनाम ठेवलं पोन्चम- (पंचम..) बाळाचे पाय पाळण्यात दिसायचे राहिले नाहीतच- संगीतकार म्हणून एस डी बर्मन ह्यांचा चित्रपटसृष्टीत दबदबा होताच- त्यांचा वारसा पंचमने पुढे चालवला नसता तरच नवल- पण केव्हापासून? १९६९ साली आलेल्या आराधना मधलं मेरे सपनो की रानी हे गीत एस डी नी नाही आर डी ने संगीत बद्ध केलंय हे अनेकांना माहित असेल- पण हे किती जणांना माहितीये की ९ वर्षांचा असताना पंचमने एक बहारदार चाल केली होती जी गुरु दत्तच्या पुढच्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या फिल्म साठी एस डी नी वापरली- चित्रपट होता प्यासा आणि गीत होतं सर जो तेरा चकराये... चलती का नाम गाडी, बंदिनी, गाईड, तीन देवीया... किती तरी चित्रपटासाठी त्यांनी आपल्या वडिलांकडे साहाय्यक म्हणून काम केलं- अगदी है अपना दिल तो आवारा..मधला माऊथ ऑर्गन सुद्धा त्यांनी वाजवला... अखेरीस मेहमूद ने १९६१ मध्ये बर्मन च्या ह्या “छोटे नवाब” ला त्याचा पहिला स्वतंत्र चित्रपट मिळवून दिला-

त्यानंतर मात्र पंचमने मागे वळून पाहिलं नाही- पाहण्याचा प्रश्नच नव्हता कारण मुळातच त्याला काळाच्या पुढचं सुचायचं, दिसायचं, ऐकू यायचं- तिसरी मंझील ने सुसाट सुटलेली त्यांची गाडी पुढे इतका सुंदर प्रवास करून गेली- यादो की बारात, पड़ोसन, ज्वेल थीफ़, प्रेम पुजारी, अमर प्रेम, कटी पतंग, अनामिका, नमकहराम, शोले, दीवार, सागर... अगदी १९४२ a lovestory पर्यंत.. १९७२ साली गुलज़ार नावाचा राजहंस डौलदार शब्दांचे मोती घेउन त्यांच्या कड़े आला- आणि सुरांच्या मान सरोवरात श्रोते आकंठ बुडून गेले...परिचय मधील मुसाफिर हूँ यारों सुचलं तेव्हा रात्रि १ वाजता पंचमने गुलझारांना जागं केलं आणि सकाळ होई पर्यंत रिकाम्या रस्त्यांवर ही जोडगोळी हे गाणं गाडी मध्ये लूप वर लावून ऐकत फिरत होती- गुलझारांच्या डोळयात पाणी होतं आणि पंचम च्या काळजात आदल्याच दिवशी झालेल्या घटस्फोटाच्या जखमा... परिचय, मासूम, आंधी, किताब, किनारा, इजाजत, मौसम, अंगूर एकाहून एक सरस चित्रपट आणि त्याहून सरस गाणी...संगीतकार गीतकारांच्या तमाम जोड्यांमधली ही बेस्ट पेअर होती आणि राहील- 

संध्याकाळ अजून कातर करणारी शोले मधली धून असो, की दम मारो दम मधला वाद्यांचा कल्लोळ, जय जय शिव शंकर मधला झुलायला लावणारा नशीला झोल असो की आपकी आंखों मे कुछ मधला प्रेमळ मोहक गोडवा,, पंचमच्या चाली कायमच वेगळ्या असायच्या- सामान्यांना भावणा-या तरीही उत्तम अभिरुची जपणा-या- सवंगता हा शब्द त्याच्या शब्दकोशात कधीच नव्हता. अगदी पिया तू अब तो आजा सारखा कॅब्रे आणि मेहबूबा मेहबूबा सारखं अरेबिक ढंगाचं (आजच्या भाषेत आयटम song) गाणं सुद्धा आजच्या फेविकॉल जलेबी आणि चुंबक पेक्षा कैक पटीने दर्जेदार आहे- पाश्चिमात्य ढंगाचा वाद्यवृंद असो की सुरावटीची भारतीय बैठक, पंचम त्या सगळ्या मिश्रणाला स्वतःच्या “जीनियस क्रिएटिव्हीटीचा” अफलातून तडका द्यायचा- आणि ते गाणं खास “पंचम” च्या सही शिक्क्याचं होऊन जायचं- 
एखाद्या गाण्याच्या बाबतीत तो किती वेगळा विचार करायचा ह्याचे किस्से अनेक आहेत- खुशबू ह्या गुलझारांच्या फिल्म च्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होतं- गाणं होतं- ओ माझी रे अपना किनारा... अचानक पंचमने रेकॉर्डिंग थांबवलं आणि सोडा water च्या बाटल्या मागवल्या- स्टुडिओत खसखस पिकली की बाबूमोशाय चा मूड आज वेगळ्याच गोष्टींचा आहे- सोड्याच्या बाटल्यां नंतर आता व्हिस्की येणार हे ओघानंच आलं- पण पंचमने त्या बाटल्या रिकाम्या केल्या- आणि त्या कमी जास्त पाण्याने भरल्या- सगळ्यांची उत्कंठता शिगेला पोचली आणि एकाच वेळी त्याने दोन्ही बाटल्यांत हवा फुकून पाण्याच्या लाटेचा भास निर्माण केला- ओ माझी रे अपना किनारा हे गाणं ऐकताना जो लाटांचा आवाज येतो तो हा असा आलेला आहे- मेरे सामने वाली खिडकी मी च्या सुरुवातीला बेभान होऊन साईड रिदम देणारा केस्ट्रो मुखर्जीचा कंगवा, चुरालीया है तुमने च्या आधी वाजणारा ग्लासेसचा किणकिणता नाद- तेरे बिना जिया जायेना गाण्यात नेमक्या ठिकाणी बोलणारं मादल... हे सगळे प्रयोग केवळ पंचमच करू जाणे-
एक चतुर नार मधला वेडेपणा, मेरा कुछ सामान सारख्या तरल कवितेला गीत बनवण्याची जादू, लकडी की काठी मधली निरागसता असो किंवा आजा आजा मै हू प्यार तेरा मधला वाद्यांचा बेबंद कल्लोळ असो... ह्या सा-या रंगातही चिंगारी कोई भडके किंवा रैना बीती जाये मधल्या भळभळत्या दु:खाचा रंग हाच पंचम च्या आयुष्याचा रंग ठरला... इतक्या सा-या सुरांशी यारी असूनही आयुष्याचा बेसूरपणा पंचम पुसू शकला नाही- मग ते awards असो की खाजगी आयुष्य, त्याने छेडलेल्या  प्रत्येक सुरावटीला नियतीने चुकीचा ताल वाजवून त्याची खिल्ली उडवली- आशा भोसले, राजेश खन्ना, किशोर कुमार गुलझार ह्या मित्रांमुळे जगणं सुसह्य झालं..  तरी आयुष्याच्या मैफिलीची भैरवी फार करुण आणि अकाली गाऊन हा मनस्वी कलावंत ४ जानेवारी १९९४ ला आपल्यातून निघून गेला... गुलझार साहेबांच्याच भाषेत सांगायचं तर त्याचं आयुष्य म्हणजे.... “ थोडी सी है.. जानी हुई, थोडी सी नयी, जहां रुके आसू वही पूरी हो गयी.. है तो नयी फिर भी है पुरानी... थोडासा बादल थोड़ासा पानी और एक कहानी...”




Comments