dil dosti duniyadari





हे पत्र माझ्या एका जुन्या मित्राला, जो नवीनच मैत्री झाल्यासारखा अंतर राखून वागतोय...
( To my old friend, who is behaving as a new one..)
...............................

आठवतंय तुला..? आपली मैत्री होती... आपण पूर्वी बेफाम भेटायचो.. ओढ होती भेटण्याची... कारणं शोधायचो भेटायला... भेटलो की काही वेळा नुसतेच हसायचो- काही बोलण्याची गरजच नव्हती तेव्हा.... न सांगताच सगळं कळण्याचे दिवस होते ते...
आपल्या नात्याला एक नाव होतं.. जगाने दिलेलं... पण आपल्याला त्या नावाची कधी गरजच पडली नाही- आपलं बोलणं, भेटणं, आपल्यातल्या गप्पा त्या नात्यापलीकडच्या होत्या. पहिल्याच भेटीत लक्षात आलं होतं आपल्या, की आपल्यातल्या नात्याला मैत्री हे नाव पुरेसं आहे. आणि आपल्या आयुष्यात आत्ता जे आहेत त्यांना आपल्या बद्धल काहीही वाटलं किंवा उद्या नवीन कोणीतरी आलं तरी आपल्याला काही फरक पडणार नाहीये- कारण आपलं नातं ना ह्या मैत्रीच्या अलीकडचं होतं, ना पलिकडचं.. ना ते मैत्री पेक्षा कमी होतं आणि ना मैत्री पेक्षा जास्त... ही जाणीव तुला झाली की नाही, माहित नाही. पण मला लक्खपणे झाली. आणि खरं सांगते तुला, ज्या क्षणापासून ही जाणीव झाली, मला कोणाचीच पर्वा करावीशी वाटेना.. मग समुद्रात आत आत शिरताना तुझा हात धरणं असो, आपल्या सोबतचे लोक मागे राहिले असताना तुझ्या बाजूला बसून गप्पा मारणं असो, एखादी छान गोष्ट सांगताना तुझ्या डोळ्यातला चमचमता आनंद बघणं असो की एखादं सिक्रेट शेअर करताना आपलं स्पेशल हसू हसणं असो, मला सगळं खूप स्वच्छ वाटायला लागलं. कोण काय बोलेल, कोण आपल्यातल्या जवळकीचा काही चुकीचा अर्थ काढेल किंवा कोणाला काय वाटेल याची भीती वाटेनाशीच झाली मला.. कोणी तरी उगाच आपल्याला भाऊ बहिण वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला. पण मी मगाशी म्हटलं होतं तसं, आपण ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलो होतो. खूप काळाने मला असा एक मित्र मिळाला होता, जो माझ्याच सारखा पागल होता. जो माझ्याचसारखा हसरा होता. माझ्यापेक्षा जास्त चांगला होता मनाने. आणि माझ्यापेक्षा बुद्धू होता... एक असा मित्र


ह्याच्या खांद्यावरच काय मांडीवर डोकं ठेवून झोपू शकेन आणि कुठलीही गोष्ट शेअर करू शकेन असा विश्वास होता मनात. एक असा मित्र होता माझ्यापाशी, ज्याच्यावर हक्काने रागावता येत होतं. ज्याच्या भल्याची मला असलेली काळजी समजून घेऊ शकत होता माझा मित्र....
पण सगळ्याच गोष्टीना आयुष्यात एक्सपायरी डेट असते, आय थिंक... आपल्या नात्याला ओहोटी लागली.. ओहोटी माहितीये ना तुला.. भरती नंतर येते ती.. कधी काळी इथे बुडून जाऊ इतकं पाणी होतं अशी आठवण करून देणारी ओलसर वाळूच जेव्हा शिल्लक राहते, तेव्हा ओहोटी आलेली असते. आपल्या पण नात्याला ओहोटी लागलीये का? मला गेले काही महिने, दिवस, तास तसं वाटायला लागलं आहे.. आणि मला त्याचा खूप त्रास होतोय.. मी तक्रार करत नाहीये, तुझ्यावर आरोप करत नाहीये. मला हे का कधी आणि कसं झालं हेच कळत नाहीये मला... आठवायचा प्रयत्न केला पण आठवत नाहीये नेमकं कधीपासून आपण एकमेकांशी अंतर ठेवून वागायला लागलो? नेमकं कधी पासून आपण एकमेकांना टाळायला लागलो? तू घरी यायचास माझ्या, तुझ्यासाठी तो एस्केप+एक्झिट point होता.. तुला वेगळा एस्केप कधी मिळाला? माझ्या घरी यायला तुला कारण लागत नसे. infact असं या आधी सुद्धा झालंय की तू विचारलंयस मी येऊ का घरी? आणि मी नसले तर मी तसं सांगितलंय.. मग नेमकं केव्हापासून तुला याचं वाईट वाटायला लागलं? तू माझ्या घरी येणं, येऊन माझ्याशी गप्पा मारणं का बंद केलंस? मी तुझ्या घरी येऊन बोलायला लागले की आपल्याला किती डिस्टर्बन्स होतो हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. सो तू माझ्या घरी आल्याशिवाय आपल्याला ती स्पेस मिळणार नाही, आपल्याला भरभरून बोलायला मिळणार नाही, हे तुझ्या लक्षात येत नाहीये का तुला आता माझ्यासोबत बसून बोलण्याची गरज उरली नाहीये..??
मला गरज आहे तुझी... तू माझा खूप जास्त चांगला मित्र आहेस. असा मित्र ज्याला गमवायची कल्पनाही मला दु:खी करते. माझा मित्र माझ्याशी त्याची सिक्रेट्स आणि त्याचे प्रॉब्लेम्स आजकाल शेअर करत नाही  हे लक्षात आल्यावर मला अस्वस्थ व्हायला होतं.


काय झालंय नेमकं? मी काही जास्त बोलून गेले का? एका माणसाने दुस-या माणसाला किती सल्ले द्यावेत याची एक सीमारेषा असते ती मी ओलांडली का? माझ्या नकळत मी तुझ्या एखद्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं का? मी तुला जिव्हारी लागेल असं काही बोलून बसले का? मला उत्तर हवंय मित्रा, कारण मला ही स्टेज सहन होत नाहीये. पूर्वी रात्री २ वाजता सुद्धा मला एसेमेस /whatsapp करणारा माझा मित्र आता मला तोंडावर सांगतो की तुला नाही सांगितल, नाही कळवलं कारण तू “बिझी”(????) होतीस....!!! आणि तुला असं वाटतं की मी आपल्यात काहीच बिनसलं नाहीये यावर विश्वास ठेवू??
माझा अट्टाहास नाहीये की तू मला सगळं सांग, पण किमान आपल्या मैत्रीत ती एक ओढ होती, honesty होती आणि आपल्याला एकमेकांसोबत असण्याची आवड होती... किमान ती हरवली आहे हे मान्य तरी कर...... ते मान्य केलंस तर हे सगळं का, कधी, कसं आणि कुणामुळे घडलं याची उत्तरं नाही मागणार मी........ पण मान्य कर एकदा, की हो आपल्यात काहीतरी बिनसलं आहे..................कुठे काय काहीच नाही, सगळं ठीक आहे, तुला जे वाटतंय तसं काही झालं नाहीये असं बोलून माझ्या मैत्रीचा insult करू नकोस.......
आणि जमलं तर....... प्लीज......... मला माझा तो जुना मित्र परत दे..............
I m dying .. without my friend and my friendship.
-         awaiting

Comments